स्टीफन विल्यम हॉकिंग (जानेवारी ८, १९४२ - १४ मार्च, २०१८:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे मानद सदस्य होते. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली. त्यांच्या जीवनावर निघालेला द थिअरी ऑफ एवरीथिंग हा चित्रपटही खूपच गाजला. असाध्य रोगाने आजारी असतानाही शेवटपर्यंत आपल्या कार्यात खंड पडू न देणा-या या प्रेरणादायी संशोधकाविषयी जाणून घ्यायला आपल्या सर्वांनाच खूप आवडेल.