डॉ. रॉबर्ट कॉख हे १८६२ मध्ये जर्मनीतील गॉटींजेन महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होते. तेथे त्यांच्यावर हेन्ले या प्राध्यापकाचा प्रभाव पडला. हेन्ले यांनी १८४० मध्ये परोपजीवी जंतूंमुळे रोग होतात, असे एका प्रबंधात मांडलं होतं. वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेत असताना संसर्गजन्य रोग या विषयाबद्दल रॉबर्ट कॉख यांना विशेष आवड निर्माण झाली. १८६० मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. अँथ्रॅक्सच्या संशोधनातल्या अनुभवावरून कॉख यांनी विशिष्ट जंतूंमुळे विशिष्ट रोग होतो, ही कल्पना मांडली खरी; परंतु हे सिद्ध करण्यासाठी तो विशिष्ट जंतू शुद्ध स्वरूपात कसा वाढवावा, हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते. एखाद्या जिवाणूचा एखाद्या आजाराशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी, तो जिवाणू शुद्ध स्वरूपात असणं आवश्यक आहे; हे रॉबर्ट यांच्या लक्षात आलं. तपासणीसाठी घेण्यात आलेल्या रक्त-लघवी-जुलाब इत्यादी कोणत्याही नमुन्यांमध्ये अनंत प्रकारचे जिवाणू असतात. त्यातील प्रत्येक जिवाणूची एकेक पेशी घनपृष्ठभागावर वेगळी करता आली; तर या एकेक पेशीच्या पेशीविभाजनातून आपल्याला केवळ एकाच प्रकारच्या पेशींची वसाहत मिळू शकते; असा रॉबर्ट यांचा तर्क होता आणि तो खराही ठरला. पेशींची वसाहत वाढवण्यासाठी आवश्यक असलेले नेमके पोषक अन्नघटक आणि अगार-अगार ही पावडर वापरून यांनी प्रयोगशाळेत कृत्रिम घन माध्यम तयार केलं. हे माध्यम पेट्रिडिशमधे ओतून त्यावर जिवाणू विभक्त केले. या तंत्रामुळे १८८२ ते १९०० या काळात युरोपमध्ये प्रादुर्भाव असलेल्या अनेक रोगांचे जिवाणू शुद्ध स्वरूपात मिळवणे शक्य झाले. या रोगांमध्ये सिफिलिस, गनोरिया, टायफस, डिसेंट्री, टय़ूबरक्युलॉसिस अशा रोगांचा समावेश होता.