रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये म्हणजे भारतीय संस्कृतीचे ज्ञानकोशच आहेत. महर्षी वेदव्यास आणि महर्षी वाल्किकींचे केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर अनंत उपकार आहेत. कारण त्यांनी आपल्या दिव्यदर्शी, त्रिकालदर्शी प्रतिभेतून या दोन महाकाव्यांमध्ये संपूर्ण मानवी जीवनाचे जे सर्वस्पर्शी विवेचन केले आहे त्याला जगातल्या कुठल्याही वाङ्मयात जोड नाही. "व्यासोच्छिष्ट जगत्स र्वम्' असे जे म्हणतात ते याचमुळे. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे, तिचा उच्चतम विकास जो झाला आहे त्याच्या मुळाशी या दोन महाकाव्यातील संस्कारक्षम असलेल्या अनेक कथांमधून, पूर्वजांच्या इतिहासामधून जी शाश्वत नीतिमूल्ये, जीवनमूल्ये या संस्कृतीत रुजविली गेलीत त्यालाच द्यावे लागेल. या दृष्टीने या दोन महाकाव्यांचा सखोल अभ्यास करून त्याील ही अमोल साहित्य रत्ने नवीन पिढीच्या स्वाधीन केली पाहिजेत. त्याच हेतूने प्रेरित झालेल्या या प्रकल्पात आपण आज 'भगीरथ'या आपल्या पराक्रमी पूर्वजाचा थोडक्यात इतिहास पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.